परत झालेल्या लॉकडाऊन मुळे लोकांच्या मनामध्ये भीतीची भावना निर्माण झालेली आहे. या महामारीमुळे आपल्या मानसिक आरोग्यावर दूरगामी परिणाम झालेले आढळून येतायेत. यामध्ये लहान मुलांपासून वयस्कांपर्यंत कुठलाही वयोगट सुटलेला नाहीये. वर्षभरापूर्वीचा लॉकडाऊन आणि आत्ताचा लॉकडाऊन यामध्ये बरेच फरक आढळून आले, जसे की वर्षभरापूर्वी आपल्याला आयसोलेशन म्हणजे काय ? Hospitalization कसे करायचे ? किंवा quarantine राहायचं म्हणजे काय ? मला जमेल का ? असे अनेक प्रश्न सतावत होते परंतु आता जॉब नसणे ,लहान मुलांची चिंता याबरोबरच आपल्या आप्तेष्टांचे किंवा जवळच्या व्यक्तीचे झालेले निधन असे एक न अनेक भावनिक चॅलेंजेस आपल्या समोर येऊन उभे राहिले आहेत, आणि यामुळे समाजाची मानसिक अवस्था ढासळलेली दिसून येत आहे.
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव जसा वाढतोय तसा त्याचा परिणाम समाजात त्यांच्या वागणुकीवर दिसून येतोय. आर्थिक संकट आणि मूलभूत सोयी-सुविधांचा अभाव यामुळे अनेकांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी चिंतेपायी अतिप्रमाणात हात धुतले जात आहेत. तसेच भीतीपायी Anxiety , Depression या सारखे मानसिक आजार झपाट्याने वाढतांना दिसतायेत.
वर्षभरापूर्वी सगळ्यांनीच हा लॉकडाऊन काही प्रमाणामध्ये एन्जॉय करायला सुरुवात केलेली, नवीन पदार्थ करणे, घरातल्या बरोबर वेळ घालवणे, आपले छंद जोपासणे आणि बरेच काही परंतु जसजसा लॉकडाऊन वाढत गेला तसतसा या गोष्टी मधली नाविन्यता संपली. इतर देशांच्या तुलनेत आपल्या देशातील लोकांनी या गोष्टीमध्ये बऱ्यापैकी मार्ग काढायला सुरुवात केलेली , याचे कारण आपल्या देशात सांगितलेली आदर्श जीवन पद्धती हे एक असू शकते. तसेच काही लोकांमध्ये याचा खूप सकारात्मक बदलही दिसून आला. लाइफस्टाइल मध्ये चेंजेस झाले, तसेच मेंटल हेल्थ अवेअरनेस झाला, नवीन वाटा शोधल्या गेल्या आणि त्यावर चालायला सुरुवात झाली.
एकीकडे हे सगळं कधी संपेल याची आतुरतेने वाट बघत असतांना काही महत्वाच्या गोष्टी परत एकदा लक्षात ठेउयात.
१. मला भीती वाटते आहे हे सवर्प्रथम मान्य करा आणि लक्षात ठेवा भीती वाटणारे तुम्ही एकटे नाही आहात.
२. नक्की कशाची भीती वाटते आहे हे शोधून काढा.
३. छोटी काम घ्या , पूर्ण करा आणि महत्वाचे म्हणजे त्या पूर्णत्वाचा आनंद साजरा करा.
४. आपला छंद जोपासतांना आपल्या जवळच्या लोकांबरोबर वेळ घालवा.
५. आपला दिनक्रम ठरवा. आणि तुमचे विचार आणि भावना याची वहीमध्ये रोज नोंद घ्या.
६. योगा, Meditation, ब्रेन जिम यासारख्या गोष्टी करायला सुरुवात करा.
७. Google Search आणि News Channel यांचा अनावश्यक वापर टाळा.
८. आपल्या आजूबाजूला अनेक Interactive Platform तयार झालेले आहेत त्यावर active व्हा.
९. काही वाटत असल्यास आपल्या संपर्कात असलेल्या मानासोपचार तज्ञाला संपर्क करा.
आयुष्याकडे सकारात्मकतेनं पाहता यावं यासाठी मानसोपचारतज्ज्ञ मदतीला धावले आहेत. अनेक गोष्टींकडे नव्यानं-वेगळ्या दृष्टीनं पाहता येईल का अशा प्रश्नांचं विश्लेषण मानसोपचारतज्ज्ञ ‘ब्लॉग’, ऑडिओ सीरिजमधून करत आहेत. बाहेरच्या नकारात्मक स्थितीत स्वत:चं संतुलन कसं राखावं, आव्हानांना तोंड देण्याची मानसिक तयारी कशी करावी इथपासून ते मनाची स्वच्छता कशी करता येईल, इथपर्यंत अनेक मुद्द्यांवर बोललं जात आहे. तर काही Help Line कार्यरत आहेत तिथेही तुम्ही संपर्क करू शकता, त्याची लिस्ट मी इथे देत आहे.
1. Let’s Talk – 1800-120-820050 ( Time – 24/7 )
2. KIRAN – 1800-599-0019 ( Time – 24/7 )
3. Samaritans – 84229 84528 ( Time – 5 PM – 8 PM )
4. Connecting NGO – 9922004305 ( Time – 12 PM – 8 PM )
5. iCall – 022-25521111 ( Monday-Saturday, 8 AM to 10 PM )
काही हेल्पलाईन चालू असल्याची मी खात्री करून घेतली आहे. सगळ्यांचा संपर्क होऊ शकला नाही..
पण जी यादी मी संकलित करू शकली ती टाकली आहे.
प्रत्येकाने स्वतः खात्री करून घ्यावी.
धन्यवाद
श्रेया कुलकर्णी जोशी
Clinical Psychologist
Foundar Myndful Mantras