चौथी माळ: देवी कुष्मांडा
कौशल्य – सर्जनशीलता
आजची दुर्गा: सौ. वैशाली नीलेश गायकवाड
स्त्रिला निसर्गदत्त किंवा नैसर्गिकरित्या एवढ्या बिरुदावल्या बहाल केल्या आहेत की, त्यामुळे खरंतर ती स्वतःच स्वतंत्ररित्या सगळ्या संसाराची, अखंड चराचराची, ब्रह्मांडाची पालनकर्ती आहे. म्हणूनच आता वेळ आली आहे स्वतःच स्वतःची उद्धारकर्ती होऊन स्वतःमधील सुप्तगुण, दडलेल्या कला, अवगत असलेली कौशल्ये कुठेतरी लुप्त होण्यापूर्वी योग्यवेळी – योग्य ठिकाणी – योग्य लोकांसोबत – योग्य दिशेने मार्गक्रमण करण्याची, असे म्हणत रोजच्या जगण्यात नवनवीन गोष्टी शिकत प्रत्येक जबाबदारीत स्वतःची छाप उमटवणारी आजची आपली चौथी दुर्गा वैशाली गायकवाड.
शारदीय नवरात्रौत्सवात माईडफुल मंत्राज जागर करीत आहे अशा नऊ महिलांचा ज्यांच्या तिमिरातून तेजाकडे जाण्याच्या प्रवासामुळे अनेकांना प्रेरणा मिळते आहे, आणि यापुढे देखील मिळत राहील. आजच्या डिजिटल विश्वात आपण अशा महिलांचा जागर करणार आहोत ज्यांनी खऱ्या अर्थाने देवीच्या गुणांना अंगिभूत केले आहे. अशा महिला ज्यांनी नवदुर्गांचा अंश आमच्यातही आहे असं म्हणत संकटांवर मात केली आहे आणि आज त्या दिमाखात इतरांना संकट काळात लढण्याची प्रेरणा देत आहेत.
पदवी नंतरचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वैशाली गायकवाड यांनी ग्रंथपाल प्रमाणपत्र पदवी पूर्ण केली. विविध माध्यम क्षेत्रातील प्रशिक्षण कोर्स देखील त्यांनी पूर्ण केले आहेत. रेव्हेन्यू डिपार्टमेन्टमध्ये 8 वर्षे काम केल्यानंतर पितांबरी उद्योग समुहामध्ये मीडिया आणि जाहिरात विभागाचा सात वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. व्यास क्रिएशन्समध्ये गेल्या तीन वर्षापासून राज्ञी वुमन वेल्फेअर असोसिएशनचा कार्यभार कार्यकारी संचालिका म्हणून हातात घेतला आणि त्या अत्यंत समर्थपणे हा पसारा सांभाळत आहेत.
काही वर्षांपुर्वी असाध्य व्याधींनी वैशाली गायकवाड यांना ग्रासले होते. परंतु एखाद्या असाध्य व्याधीमधून ऊर्जा घेऊन फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेत वैशाली गायकवाड यांनी कविता लेखन, ‘कस्तुरी’ अंकातील लेखन, महिलांसाठी विविध अंगी स्पर्धा, उपक्रम, शिबिर, कौशल्य या सगळ्यांमध्ये स्वतःला गुंतवून घेतलं. आपण दुसर्यांना काय देऊ शकतो ही मनोमन भावना ठेवून त्या अखंड कार्य करीत राहिल्या आणि याच सगळ्या अविरत कार्यामधूनच त्या कार्यशीलपणे घडत गेल्या.
‘राज्ञी’ म्हणजे प्रत्येक स्त्रीमधल्या ‘ती’च्यातील ‘मी’साठीचा एक प्रवास. जबाबदार्या, कर्तव्ये, सामाजिक, कौटुंबिक दडपणे अशा एक ना अनेक गोष्टींमुळे प्रत्येकीतील ‘ती’ मधील ‘मी’ कुठेतरी हरवून जाते. ‘राज्ञी’ मध्ये हेच खोडून काढून प्रत्येकीचा ‘ती’च्यातील ‘मी’पर्यंतचा प्रवास हा आनंद, उत्सव आणि उत्कर्षाने भारावून टाकणारा असावा यासाठी वैशालीताई विविध उपक्रमांचे आयोजन करतात. जसे कि बौद्धिक विचारांची देवाणघेवाण करणारा ‘संवाद कट्टा’, ‘ती वसुंधरा, मी वसुंधरा’ असा अनोखा असलेल्या कपड्यांचा फॅशन शो, ‘पर्यावरण पूरक घरगुती गणपती बाप्पा सजावट स्पर्धा’, ‘सेल्फी स्पर्धा’, ‘विश्वास गतिमंद शाळे’तील मुलांसाठी ‘पुस्तक हंडी’, ‘चैतन्य’ शाळेतील दिव्यांग मुलांसोबत रक्षाबंधन साजरे करून त्या मुलांनी तयार केलेल्या राख्या, ग्रीटिंग कार्ड्स वेगवेगळ्या शोभिवंत वस्तू या विकत घेऊन त्यांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याचे काम देखील गेले तीन वर्ष राज्ञी वुमन वेलफेअर असोसिएशन संस्था अविरतपणे करत आहे. तसेच महिलांसाठीची एक अनोखी ‘पुस्तक भिशी’ त्याबरोबरच फिरत्या वाचन कट्ट्या’चे आयोजन, महिलांचे मानसिक आरोग्य नीट राहावे यासाठी राज्ञी मनाचा कोपरा हा मानसोपचारतज्ञांच्या मदतीने चालू केलेला सदर तसेच किचन टिप्स अशा वेगवेगळ्या उपक्रमाची निर्मिती सर्जनशीलपणे वैशाली गायकवाड करत असतात.
राज्ञी वुमन वेलफेअर असोसिएशनच्या 2020 मध्ये जवळपास 700 मैत्रिणी एकत्र आल्या आणि राज्ञी मंचाची स्थापना करण्यात आली आणि आज राज्ञी मंचाच्या 1500 हून अधिक महिला सभासद आहेत.
प्रत्येक क्षणात स्वतःची नव्याने ओळख करुन घेत सर्जनशीलपणे नवनवीन ध्येयांना गवसणी घालत कुष्मांडा देवीच्या सर्जनशीलता या गुणांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या नवदुर्गेला माईंडफुल मंत्राजतर्फे मानाचा मुजरा.
देवी कुष्मांडा श्लोक :
सुरासम्पूर्णकलशं रुधिराप्लुतमेव च।
दधाना हस्तपद्माभ्यां कूष्माण्डा शुभदास्तु मे॥
रोज ९ दिवस आम्ही एक एक देवी आणि तिचे कौशल्य बरोबर नऊ महिलांचा ज्यांच्या तिमिरातून तेजाकडे जाण्याच्या प्रवासामुळे अनेकांना प्रेरणा मिळते आहे, आणि यापुढे देखील मिळत राहील अश्या महिला- आधुनिक दुर्गा आपल्यासमोर आणायचा प्रयत्न करणार आहोत.
आपणही जास्तीत जास्त मित्र मैत्रिणींना या पोस्ट ला Tag करून, ही पोस्ट शेअर करून जास्तीत जास्ती समाजापर्यंत ही कल्पना पोहोचवावी ही विनंती.
स्त्रीच्या प्रगतीत सहाय्यक ठरणाऱ्या, खरेतर तिला इतरांपेक्षा वेगळ्या ठरवणाऱ्या मानसिकतेचा, Powerful “Myndful Mantras” चा आपण या नवरात्रीत जागर करू.
या वर्षीच्या इतर नवदुर्गांविषयी माहिती वाचण्यासाठी खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करा –
पहिली माळ – https://bit.ly/MyndfulNavdurga23Day1
दुसरी माळ – https://bit.ly/MyndfulNavdurga2023Day2
तिसरी माळ – https://bit.ly/MyndfulNavdurga23Day3
नवशक्तीचा – नवरात्रोत्सवाच्या हार्दीक शुभेच्छा!
श्रेया कुलकर्णी
Founder Myndful Mantras
Clinical Psychologist
REBT Practitioner