पहिली माळ: देवी शैलपुत्री
कौशल्य – सामर्थ्य, धैर्य
शारदीय नवरात्रौत्सवात माईडफुल मंत्राज जागर करीत आहे अशा नऊ महिलांचा ज्यांच्या तिमिरातून तेजाकडे जाण्याच्या प्रवासामुळे अनेकांना प्रेरणा मिळते आहे, आणि यापुढे देखील मिळत राहील.
आजच्या सोशल मिडियाच्या विश्वात आपण अशा महिलांचा जागर करणार आहोत ज्यांनी खऱ्या अर्थाने देवीच्या गुणांना अंगिभूत केले आहे. अशा महिला ज्यांनी नवदुर्गांचा अंश आमच्यातही आहे असं म्हणत संकटांवर मात केली आहे आणि आज त्या दिमाखात इतरांना संकट काळात लढण्याची प्रेरणा देत आहेत.
ठरवलं तर सगळं काही शक्य आहे असं म्हणत नियतीने केलेल्या आघातावर सकारात्मक दृष्टीने मात करणारी आपली पहिली नवदुर्गा म्हणजेच देवी शैलपुत्रीतील सामर्थ्य आणि धैर्य या गुणांचे प्रतिनिधित्व करणारी प्रसिद्ध निवेदिका अनघा मोडक.
निवेदन विश्वातील मंत्रमुग्ध करणारा आवाज म्हणजे अनघा मोडक. मुळात निष्पाप, निर्मळ आणि सुंदर असा तिच्या नावाचा अर्थ जरी असला तरी तो सिद्ध करण्यासाठी तिची आंतरिक ऊर्जा देखील कारणीभूत आहे. अवघ्या २५ व्या वर्षी डेंग्यूमुळे डोळे गेले आणि अनघा दृष्टीहिन झाली. तरी दृष्टी परत मिळवण्यासाठीची तिची लढाई आणि जिद्द कायम आहे.
नियतीने केलेल्या या आघाताला संधी समजून अनघाने स्वतःच्या कलेला साद घातली.
Lockdown च्या काळात तिने चालू केलेला अभिनव उपक्रम म्हणजे संवाद शाळा. त्यामार्फत तिने लोकांना संवाद कौशल्य शिकवायला सुरुवात केली. त्यात जगभरातून म्हणजेच जर्मनी, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया अश्या अनेक देशांतूनही खूप जण जोडले गेले. संवादशाळा बेसिक तसेच अॅडवान्स व बाल संवादशाळा यातून २५० हून जास्ती पुरुष, स्त्रिया, लहान मुले सहभागी झाले होते. आता देखील मंचापासून प्रपंचापर्यंत संवाद कसा साधायचा या विषयी वैयक्तिक मार्गदर्शन करते.
मंत्रमुग्ध करणारा आवाज आणि भाषेवरची पकड यामुळे सुरुवातीच्या तीन सेकंदातच प्रेक्षकांना स्वतःच्या निवेदनाकडे आकर्षित करणारी अनघा आज आघाडीच्या निवेदकांमध्ये गणली जाते. आकाशवाणी, ABP माझा तसेच इतरही इलेक्ट्रोनिक व प्रिंट प्रसार माध्यमांवरती काम केलेले आहे. दृष्टी गेल्यानंतरही आंतरिक दृष्टीने मनाचा सोज्वळपणा जपणारी अनघा सामर्थ्यवान तर आहेच सोबतच कमालीच धैर्य तिच्यात आहे.
निवेदनाचा प्रत्येक विषय ती स्वतः अभ्यसते, स्वतः स्क्रिप्ट तयार करुन त्यात नाविण्य आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करते आणि यातूनच तिने निवेदन केलेला कार्यक्रम एखाद्या उंची अत्तराचा सुंगंध बहरत जावा तसा बहरत जातो. प्रत्येक कार्यक्रमामध्ये लोकांसमोर काहीतरी नवीन आणि रंजक मांडण्याचा प्रयत्न अनघा करत असते. आजच्या घडीला संपूर्ण राज्यभर व्याख्याने आणि कार्यक्रमांचे सादरीकरण अनघाने केलं आहे. जवळपास ३५० हून अधिक व्याख्याने आणि शेकडो कार्यक्रमांसाठी आजपर्यंत तिने निवेदन केले आहे. विषयाची उत्तम समज, भाषेचा गाढा अभ्यास, शांत, धीरगंभीर पण तितकाच मिश्कील स्वभाव, निर्मळ मन आणि या सगळ्यांच्या जोडीला रसाळ वाणी आणि प्रचंड मेहनत घेण्याची तयारी यामुळे अनघाच्या निवेदनाने एक वेगळीच उंची आज गाठली आहे.
देवी शैलपुत्रीच्या सामर्थ्य आणि धैर्य या गुणांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या या नवदुर्गेला म्हणजेच अनघा मोडकला माईंडफुल मंत्राजतर्फे मानाचा मुजरा.
शैलपुत्री श्लोक :
ॐ देवी शैलपुत्र्यै नमः॥
वंदे वाद्द्रिछतलाभाय चंद्रार्धकृतशेखराम |
वृषारूढां शूलधरां शैलपुत्री यशस्विनीम् ||
या देवी सर्वभूतेषु माँ शैलपुत्री रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः||
रोज ९ दिवस आम्ही एक एक देवी आणि तिचे कौशल्य बरोबर नऊ महिलांचा ज्यांच्या तिमिरातून तेजाकडे जाण्याच्या प्रवासामुळे अनेकांना प्रेरणा मिळते आहे, आणि यापुढे देखील मिळत राहील अश्या महिला- आधुनिक दुर्गा आपल्यासमोर आणायचा प्रयत्न करणार आहोत.
आपणही जास्तीत जास्त मित्र मैत्रिणींना या पोस्ट ला Tag करून, ही पोस्ट शेअर करून जास्तीत जास्ती समाजापर्यंत ही कल्पना पोहोचवावी ही विनंती.
स्त्रीच्या प्रगतीत सहाय्यक ठरणाऱ्या, खरेतर तिला इतरांपेक्षा वेगळ्या ठरवणाऱ्या मानसिकतेचा, 9 Powerful “Myndful Mantras” चा आपण या नवरात्रीत जागर करू.
नवशक्तीचा – नवरात्रोत्सवाच्या हार्दीक शुभेच्छा!
श्रेया कुलकर्णी
Founder Myndful Mantras
Clinical Psychologist
REBT Practitioner