परवा माझ्या मैत्रिणीचा फोन आला होता.. सहजच गप्पा मारायला फोन केला म्हणाली..पण बोलता बोलता लक्षात आले की काहीतरी गडबड आहे..तिला थोडे खोदून विचारले तेव्हा ती म्हणाली सध्या सगळं नकारात्मक झालय बघ वातावरण. काही सुचतच नाहीये. आपण परत कधी भेटू ? कधी सगळं व्यवस्थित होईल ? फायनान्शिअल प्रॉब्लेम्स वेगळेच,उद्योगधंधा, करिअर ह्याचं काय होईल काही सांगता येत नाहीये. असे एक न अनेक विचार मनात घर करून बसलेत ग..काय करावं समजत नाहीये, कसे deal करू या situation ला कळतच नाहीये. म्हणून म्हंटले तुला फोन करावा, तुमच्या Psychology मध्ये हे सगळे नकारात्मक विचार समूळ नष्ट करून टाकता येतील अशी काही थेरेपी वगैरे आहे का ग ?…
मी तिला समजावून सांगितले…
खरंतर नकारात्मक किंवा सकारात्मक ह्या दोन वेगळ्या गोष्टी नसून नाण्याच्या दोन बाजू आहेत म्हणजेच विचारांचाच एक भाग आहे. त्यामुळे आपण विचारांना समूळ नष्ट करू शकत नाही हे पहिले समजून घ्यायला हवं. विचार हे जसे आपल्या करण्यावर अवलंबून असतात तसेच ते अंशतः बाहेरच्या परिस्थितीवर देखील अवलंबून असतात.
सद्य परिस्थितीत बाहेरील वातावरणावर आपण नियंत्रण करू शकत नसल्यामुळे, आपण काय विचार करतो यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
जसे सध्या घरात अडकून पडलो आहोत याउलट आपण घरात सुरक्षित आहोत हा दृष्टिकोन आपल्याला जास्त महत्त्वाचा आहे हे लक्षात घ्यायला हवे.
थॉमस अल्वा एडिसन ह्यांनी ९९९ प्रयत्नां नंतर दिव्याचा शोध लावला. त्यावेळी पत्रकारांनी मुलाखतीत विचारले, तुमचे ९९९ प्रयत्न फसले ह्यावर तुम्हाला काय म्हणायचं आहे? त्यावर थॉमस यांनी सांगितले आता ९९९ वेळा मी हे सिद्ध करू शकतो की या मार्गाने दिवा लागू शकत नाही.
ह्यालाच नकारात्मकतेतून सकारात्मक दृष्टिकोन शोधणे असे म्हणतात.
नकारात्मक विचारांना सकारात्मक करणे म्हणजे आपल्याच मनाचे आपल्या मनाशी युद्ध करणे, यालाच तुकाराम महाराज म्हणतात
रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग |
आंतर बाह्य जग आणि मन ||
सध्या बाह्य जग आणि आंतर मन यांच्यात सतत युद्धाचा प्रसंग उद्भवत आहे. दैनंदिन जीवनात सुद्धा आपल्याला साहस, धैर्य दाखवावं लागतंय. असेच साहस दाखवत आपल्याला सद्य परीस्थितीशी सामोरं जायचंय. यासाठी आपण खालील त्रिसूत्रींचा वापर करू शकतो.
१. कालावधी (Duration)
२. वारंवारता (Frequency)
३. तीव्रता (Intensity)
आपल्याला सकारात्मक विचारांचा कालावधी, वारंवारता आणि तीव्रता वाढवायची आहे, तसेच नकारात्मक विचारांची कमी करायचीये.
म्हणजे काय विचारांचे चक्र तर सतत आपल्या डोक्यात चालू असते त्यात जास्तीत जास्त वेळ, सारखे सारखे आणि अधिक तीव्रतेने सकारात्मक विचार आले पाहिजेत त्याची आपल्याला Practice करायला लागेल. त्याबरोबरच नकारात्मक विचार कमीत कमी वेळेस, बऱ्याच वेळेनंतर आणि सौम्य स्वरूपाचे येतील असे पण बघायला लागेल.
जसं मला आत्ता घरातून बाहेर पडावसं वाटतंय किवां बाहेरून जेवण मागवावस वाटतंय..
अशा विचारांना हे खरच आवश्यक आहे का ? जीवनावश्यक आहे का ? असे प्रश्न विचारून बघायला हवे, ह्याप्रमाणे अशा विचारांची तीव्रता कमी करायचीये.
तसेच आज मी Online Skills (कला) शिकले मग असेच अजून काही मी शिकू शकते का?
माझ्यात काय काय बदल घडवावे लागतील? आणि मी त्यात नक्की यशस्वी होईन. अशा विचारांची कालावधी, वारंवारता आणि तीव्रता आपल्याला लक्षपूर्वक वाढवायचीये.
चला तर मग काढा वही आणि लिहा..
मी सारख लिहायला सांगते अस तुम्ही म्हणाल पण “The more you Write , The better you will Get”, असं म्हणतात.
म्हणून तुमचे सकारात्मक आणि नकारात्मक विचार लिहा. शांत बसून विचार करा, कुठल्या विचारांची तीव्रता, वारंवारता आणि कालावधी आपल्याला वाढवायचं वा कमी करायचाय हे लक्षपूर्वक बघा.
काही मदत लागल्यास मी आहेच.
नेहेमीप्रमाणे वाट बघतीये तुमच्या Like ची Comment ची आणि Message ची
धन्यवाद
श्रेया कुलकर्णी जोशी