पाचवी माळ: देवी स्कंदमाता
कौशल्य – निर्दोषपणा, धैर्य, करुणा

आजची दुर्गा: डॉ. प्रमिला जरग

निसर्गाने स्त्रीला दिलेली सर्वात सुंदर देणगी म्हणजे मातृत्वाचा अधिकार. हा अधिकार सांभाळताना स्त्रीला सर्वांगाने निसर्गाशी जोडणारं तिचं एक तत्व म्हणजे करुणा. करुणा या तत्वामुळेच स्त्रीचा निसर्गातील प्रत्येक प्राणी मात्रांवर जीव जडतो. निराधार मुलींसाठी स्वतःतील मातृत्वाला सतत खुलं केलेली आणि एक ना अनेक निराधार बालिकांना सन्मानाने जगण्यासाठी आधार आणि बळ देणारी आपली आजची पाचवी दुर्गा डॉ. प्रमिला जरग.

शारदीय नवरात्रौत्सवात माईडफुल मंत्राज जागर करीत आहे अशा नऊ महिलांचा ज्यांच्या तिमिरातून तेजाकडे जाण्याच्या प्रवासामुळे अनेकांना प्रेरणा मिळते आहे, आणि यापुढे देखील मिळत राहील. आजच्या डिजिटल विश्वात आपण अशा महिलांचा जागर करणार आहोत ज्यांनी खऱ्या अर्थाने देवीच्या गुणांना अंगिभूत केले आहे. अशा महिला ज्यांनी नवदुर्गांचा अंश आमच्यातही आहे असं म्हणत संकटांवर मात केली आहे आणि आज त्या दिमाखात इतरांना संकट काळात लढण्याची प्रेरणा देत आहेत.

डॉ. प्रमिला जरग यांनी एम.बी.बी.एस. नंतर डी.जी.ओ. (डिप्लोमा इन गायनेकॉलॉजी ॲन्ड ऑब्स्टेरिक्स) ची पदविका घेऊन कोल्हापूरमध्ये डॉक्टरी केली. वडील आर. बी. मोरे हे डॉक्टर आणि डाव्या चळवळीतले नेते होते आणि आई कमलाबाई मोरे या स्वातंत्र्यसैनिक आणि सामाजिक कार्यकर्त्या होत्या. वडिलांच्या वैद्यकीय व्यवसायाबरोबरच त्या आईच्या संस्कारांचा वारसा जपत सामाजिक, राजकीय क्षेत्रांत सक्रिय राहिल्या. सध्या त्या पूर्ण वेळ सामाजिक कार्यकर्त्या म्हणून विविध शासकीय समित्यांवर कार्यरत आहेत.

डॉ. प्रमिला जरग यांच्या आई कमलाबाईंनी मुलींच्या कल्याणासाठी स्थापन केलेल्या मुंबईतील माझे माहेर या संस्थेचे काम गेली 50 हून अधिक वर्षे करीत आहेत. माझे माहेर या स्वयंसेवी संस्थेमार्फत अनेक निराधार मुलींना शिक्षण आणि व्यवसाय प्रशिक्षण देऊन आत्मनिर्भर बनवले आहे. आई कमलाबाईंचा वारसा पुढे चालावा म्हणून डॉ. प्रमिला जरग यांनी त्यांची मुलगी संहीता जरग यांना संस्थेत कार्यरत ठेवले आणि आज जरग कुटुंबातील तिसरी पिढी समाजसेवेच्या कार्यात कार्यरत असल्याचे त्यांना मनोमन समाधान आहे.

डॉ. प्रमिला जरग यांनी महिला, मुले आणि सामाजिक प्रश्नांवर वृत्तपत्रांतून लेखनही केले आहे. त्यांनी राजाराम महाराजांवर ‘शिवपुत्र राजाराम’ हे चरित्र लिहिले आहे. या त्यांच्या पुस्तकाला शासकीय अशासकीय संस्थांचे अनेक मानाचे पुरस्कारही लाभले आहेत. बालगृहांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना मार्गदर्शन करण्यासाठी त्या महाराष्ट्रभर प्रवास करतात. भारत सरकारमार्फत नागरी उपजिविका अभियानांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या निराधार महिलांच्या आधारगृह केंद्र स्थापनेसाठी राष्ट्रीय पातळीवर स्थापन करण्यात आलेल्या समितीवर डॉ. प्रमिला जरग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आजपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात तब्बल 150 हून जास्त निराधार महिलांसाठीची आधारगृहे त्यांनी स्थापन केली आहेत. वयाची तब्बल 60 वर्षे सामाजिक क्षेत्रात काम करुनही त्या त्यांच्या कार्याला जेव्हा मुंगीच्या पावलांची उपमा देतात तेव्हा खरोखर त्यांच्या या नम्रतेपुढे नतमस्तक व्हावंसं वाटतं.

स्कंदमाता देवीच्या धैर्य, करुणा या गुणांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या नवदुर्गेला माईंडफुल मंत्राजतर्फे मानाचा मुजरा.

स्कंदमाता श्लोक :
या देवी सर्वभूतेषु स्कन्दमाता रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:॥

रोज ९ दिवस आम्ही एक एक देवी आणि तिचे कौशल्य बरोबर नऊ महिलांचा ज्यांच्या तिमिरातून तेजाकडे जाण्याच्या प्रवासामुळे अनेकांना प्रेरणा मिळते आहे, आणि यापुढे देखील मिळत राहील अश्या महिला- आधुनिक दुर्गा आपल्यासमोर आणायचा प्रयत्न करणार आहोत.

आपणही जास्तीत जास्त मित्र मैत्रिणींना या पोस्ट ला Tag करून, ही पोस्ट शेअर करून जास्तीत जास्ती समाजापर्यंत ही कल्पना पोहोचवावी ही विनंती.

स्त्रीच्या प्रगतीत सहाय्यक ठरणाऱ्या, खरेतर तिला इतरांपेक्षा वेगळ्या ठरवणाऱ्या मानसिकतेचा, Powerful “Myndful Mantras” चा आपण या नवरात्रीत जागर करू.

या वर्षीच्या इतर नवदुर्गांविषयी माहिती वाचण्यासाठी खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करा –
पहिली माळ – https://bit.ly/MyndfulNavdurga23Day1
दुसरी माळ – https://bit.ly/MyndfulNavdurga2023Day2
तिसरी माळ – https://bit.ly/MyndfulNavdurga23Day3
चौथी माळ – https://bit.ly/MyndfulNavdurga23Day4

नवशक्तीचा – नवरात्रोत्सवाच्या हार्दीक शुभेच्छा!

श्रेया कुलकर्णी
Founder Myndful Mantras
Clinical Psychologist
REBT Practitioner