सहावी माळ: देवी कात्ययनी
कौशल्य – प्रतिकार, असुर-विनाशिनी
आजची दुर्गा: राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या ठमाताई पवार

कोणी विचारही केला नसेल की, कधी अंगणातील मातीत तर कधी भाकरीच्या पिठात आपल्या नाजूक बोटांनी अक्षरे उमटवणारी एक छोटी मुलगी भविष्यात राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानीत केले जाण्यायोग्य कार्य करेल. पण म्हणतात ना चमत्कार होतात, आणि आपल्या आजूबाजूलाच ते घडत असतात. निसर्गाने स्त्रीला दिलेल्या अतोनात संकटांतून मार्ग काढण्याच्या तिच्या संकल्पामधून हे चमत्कार रचत जातात. अशाच अतोनात संकटांना पायदळी तुडवत आज अनेकांचे जगणे सुखकर करणाऱ्या आपल्या आजच्या सहाव्या दुर्गा आहेत ठमाताई पवार.

शारदीय नवरात्रौत्सवात माईडफुल मंत्राज जागर करीत आहे अशा नऊ महिलांचा ज्यांच्या तिमिरातून तेजाकडे जाण्याच्या प्रवासामुळे अनेकांना प्रेरणा मिळते आहे, आणि यापुढे देखील मिळत राहील. आजच्या डिजिटल विश्वात आपण अशा महिलांचा जागर करणार आहोत ज्यांनी खऱ्या अर्थाने देवीच्या गुणांना अंगिभूत केले आहे. अशा महिला ज्यांनी नवदुर्गांचा अंश आमच्यातही आहे असं म्हणत संकटांवर मात केली आहे आणि आज त्या दिमाखात इतरांना संकट काळात लढण्याची प्रेरणा देत आहेत.

“एक स्त्री शिकली तर संपूर्ण समाजाला सुशिक्षित बनवण्यासाठी कायम झटत राहते” हे वाक्य ठमाताई पवार यांच्या कर्तृत्वाला अगदी चपखल बसते. खरंतर ठमाताईंनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाने ते सिद्ध करुन दाखवले आहे. ठमाताई या आदिवासी जमातील कातकरी समाजातील आहेत. घराला आर्थिक हातभार लावण्याच्या उद्देशाने त्यांनी कर्जत तालुक्यातल्या जांभिवली गावातील वनवासी कल्याण आश्रमात स्वयंपाक करण्याचे काम सुरू केले. अंगणातील मातीवरील अक्षरे गिरवण्याच्या त्यांच्या पद्धतीने त्यांना साक्षर करण्यासाठी आश्रमातील कुंटे दाम्पत्याने पुढाकार घेतला. एका सर्वसामान्य कातकरी आदिवासी महिलेचे रूपांतर एका सक्षम, निर्भीड आणि कार्यक्षम अशा व्यक्तिमत्वात होण्यास इथूनच सुरुवात झाली.

ठमाताई पवार यांनी आदिवासी पाड्यांवरील निरक्षरता संपवण्यासाठी पाड्यांमध्ये बालवाड्या सुरु केल्या. भजन, किर्तनाच्या माध्यमातून मागास स्त्रीयांना जागृत केले. महिलांचे व्यसनाधीनतेकडे वळण्याला समुळ नष्ट करण्यासाठी दारुबंदीसाठी प्रयत्न सुरु केले. आदिवासींच्या निरक्षरतेचा गैरफायदा घेऊन आर्थिक शोषण करणाऱ्या प्रवृत्तींविरुद्धही त्यांनी संघर्ष उभा केला त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना हिरकरणी पुरस्कार, मातृस्मृती पुरस्कार, दधिची पुरस्कार, व्ही. शांताराम असे पुरस्कार देण्यात आले आहेत. महाराष्ट्र शासनाने १९८८ मध्ये त्यांना आदिवासी सेवक पुरस्कार तर केंद्र शासनाने २००५ मध्ये आहिल्यादेवी होळकर स्त्री-शक्ती पुरस्कार प्रदान केला आहे.

आज ठमाताई पवार वनवासी कल्याण आश्रम, कोकण प्रांतच्या अध्यक्षा आहेत. महाराष्ट्रातील १८ आश्रम शाळा व त्या परिसरातील शिक्षण प्रसार व आदिवासींचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी त्या काम करत आहेत. आपण सारे भारतवासी या भावनेने देशसेवा करावी असं त्या नेहमी म्हणतात.

निरक्षरता, व्यसनाधीनता, असामाजिक रूढी आणि दुर्बलता या असूरांचा सर्वनाश करणारी अशी ही असुर विनाशिनी देवी कात्ययनीचे गुण अंगीभूत असलेल्या ठमाताई पवार यांना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानीत करण्यात आलेले आहे. तसेच 2020चा प्रभात नारी सन्मान देखील त्यांना देण्यात आला आहे.

कात्ययनी देवीच्या प्रतिकार, असुर विनाशिनी या गुणांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या या नवदुर्गेला माईंडफुल मंत्राजतर्फे मानाचा मुजरा.

कात्ययनी श्लोक :
चंद्रहासोज्जवलकरा शार्दूलवरवाहना।
कात्यायनी शुभं दध्यादेवी दानवघातिनि॥:

रोज ९ दिवस आम्ही एक एक देवी आणि तिचे कौशल्य बरोबर नऊ महिलांचा ज्यांच्या तिमिरातून तेजाकडे जाण्याच्या प्रवासामुळे अनेकांना प्रेरणा मिळते आहे, आणि यापुढे देखील मिळत राहील अशा महिला- आधुनिक दुर्गा आपल्यासमोर आणायचा प्रयत्न करणार आहोत.

आपणही जास्तीत जास्त मित्र-मैत्रिणींना या पोस्ट ला Tag करून, ही पोस्ट शेअर करून जास्तीत जास्ती समाजापर्यंत ही कल्पना पोहोचवावी ही विनंती.

स्त्रीच्या प्रगतीत सहाय्यक ठरणाऱ्या, खरेतर तिला इतरांपेक्षा वेगळ्या ठरवणाऱ्या मानसिकतेचा, Powerful “Myndful Mantras” चा आपण या नवरात्रीत जागर करू.

या वर्षीच्या इतर नवदुर्गांविषयी माहिती वाचण्यासाठी खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करा –
पहिली माळ – https://bit.ly/MyndfulNavdurga23Day1
दुसरी माळ – https://bit.ly/MyndfulNavdurga2023Day2
तिसरी माळ – https://bit.ly/MyndfulNavdurga23Day3
चौथी माळ – https://bit.ly/MyndfulNavdurga23Day4
पाचवी माळ – https://bit.ly/MyndfulNavdurga2023Day5

नवशक्तीचा – नवरात्रोत्सवाच्या हार्दीक शुभेच्छा!

श्रेया कुलकर्णी
Founder Myndful Mantras
Clinical Psychologist
REBT Practitioner