आठवी माळ: देवी महागौरी
कौशल्य – ज्ञानी, बुद्धिमानी
आजची दुर्गा – माधुरी पाटील

स्त्री ही सृष्टीची शक्ती मानली जाते म्हणूनच या शक्तीचा नवरात्रीचे ९ दिवस जागर केला जातो. निसर्गानेही स्त्रीयांना विविध क्षमतांची देणगी दिली आहे. परंतु काही महिला घरच्या आणि मुलांच्या जबाबादाऱ्यांमध्ये स्वतःच्या क्षमतांना विसरुन जातात. वेगाने बदलणाऱ्या आजच्या आधुनिक युगात महिला सक्षमीकरण हा महत्त्वाचा मुद्दा ठरतो. महिलांना सक्षम करणे म्हणजेच सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय, विचार स्वातंत्र्य या विविध क्षेत्रांमध्ये समान संधी निर्माण करुन देणे. महिला सक्षमीकरणाचे गेली २८ वर्षे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या आपल्या आजच्या आठव्या दुर्गा आहेत माधुरी पाटील.

शारदीय नवरात्रौत्सवात माईडफुल मंत्राज जागर करीत आहे अशा नऊ महिलांचा ज्यांच्या तिमिरातून तेजाकडे जाण्याच्या प्रवासामुळे अनेकांना प्रेरणा मिळते आहे, आणि यापुढे देखील मिळत राहील. आजच्या डिजिटल विश्वात आपण अशा महिलांचा जागर करणार आहोत ज्यांनी खऱ्या अर्थाने देवीच्या गुणांना अंगिभूत केले आहे. अशा महिला ज्यांनी नवदुर्गांचा अंश आमच्यातही आहे असं म्हणत संकटांवर मात केली आहे आणि आज त्या दिमाखात इतरांना संकट काळात लढण्याची प्रेरणा देत आहेत.

व्यवसायाने विमा व आर्थिक सल्लागार असलेल्या माधुरीताई सुरुवातीला नोकरीत रमल्या परंतु अनेक स्त्रीयांप्रमाणे मुल झाल्यावर त्यांना देखील मुलासाठी घरी राहणे गरजेचे ठरले. लेक शाळेत गेल्यानंतर महत्त्वाकांक्षी असलेल्या माधुरीताईंना स्वस्थ बसवेना. तिथून सुरू झाला त्यांचा बहुज्ञानी होण्याचा अखंड प्रवास. विविध कोर्सेस करत त्यांनी स्वतःतील महत्त्वाकांक्षीपणाला क्षमवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, परंतु जसजश्या त्या विविध स्तरातील महिलांना भेटत गेल्या तसतसे त्यांना महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवले पाहिजेत असे वाटू लागले. त्यातूनच त्यानी १९९५ साली स्वयंसिद्ध मैत्रीण गटाची सुरवात केली पुढे नागरी निवारा परिषदेत रहायला आल्यावर तेथील महिलांच्या समस्या जाणून २००० साली नागरी निवारा महिला मंडळाची स्थापना केली.

गेली २८ वर्षे त्या या विविध बचत गटांच्या माध्यमातून कित्येक महिलांना गृहउद्योगाचे प्रशिक्षण देत आहेत. महिलांना व्यक्तीमत्व विकास, लघुउद्योगातील विक्री कला कौशल्य शिकवून स्वयंरोजगार सुरू करून दिले आहेत. दिवाळीत तोरणं, आकाशकंदील, फराळ, पणत्या तसेच आधी १०० किलो उटणे असो किंवा संक्रातीच्या सणाला अवघ्या एक महिन्यात १ टन तिळाचे लाडू बनवणे असो त्यांच्या संस्थेतील महिला नेहमीच अग्रेसर असतात. वस्तूची पत ओळखून कच्चा माल आणने, किंमत ठरवणे, मालाचे आकर्षक पॅकींग करून विक्री पर्यंत सर्व व्यवहार माधुरी ताईंच्या मार्गदर्शनानुसार आज या महिला स्वयंपूर्णतेने करीत आहेत.

प्रत्येक कुटुंबातील स्त्री ही त्या त्या कुटुंबाचा कणा असते. स्त्री मानसिकदृष्ट्या खंबीर असेल, समजूतदार असेल तर घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते. महिलांना केवळ रोजगाराचे माध्यम पुरवून चालणार नाही तर त्यांना मानसिक बळ देणं देखील तितकंच गरजेचं आहे. हे ओळखून माधुरीताई मुलांच्या अवतीभवती रमणाऱ्या या महिलांना मुले शाळा कॉलेजमध्ये गेल्यानंतर त्यांनी नेमकं काय केलं पाहिजे यापासून ते त्यांच्या त्यांच्या आवडीप्रमाणे कोणकोणते लघुउद्योग केले पाहिजेत इथपर्यंत मार्गदर्शन करीत असतात.

विविध स्तरातील महिलांकरीता ९० पेक्षाही जास्त व्यवसाय संकल्पनांसह प्रशिक्षणाच्या कार्यशाळा माधुरी पाटील घेतात. संपूर्ण महाराष्ट्रभर प्रवास करीत गृहउद्योग प्रशिक्षण, व्यक्तीमत्व विकास व मार्केटिंग विषयांवर १००० हून जास्त प्रबोधनात्मक कार्यशाळा व मार्गदर्शन पर सत्रे त्यांनी घेतलेली आहेत. त्यांचाहा गेल्या २८ वर्षांचा प्रवास अजीबातच सोपा नव्हता. स्वतःला आलेल्या अडचणींवर उत्तरे शोधताना इतरांना अडचणी येऊ नयेत म्हणून काम करणाऱ्या माधुरीताई तितक्याच नम्र आहेत. सलग पाच वर्षे कोकण महोत्सव भरवून मालवणी लोककला व खाद्यपदार्थांना मुंबईत आणण्याचे श्रेय माधुरी ताईंना जाते. तसेच केवळ महिलांचा सहभाग असलेल्या अप्रतिम कोकण महोत्सवासाठीची पोचपावती म्हणून शासनाने महापौर पुरस्काराने माधुरीताईंना सन्मानीत केले आहे. तसेच त्यांना रोटरी क्लब पुरस्कार आणि जायंट्स क्लब पुरस्काराने देखील सन्मानीत करण्यात आले आहे.

महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करीत असताना त्या इतरही जबाबदाऱ्या अगदी लिलया पेलतात. विविध सामाजीक, शैक्षणिक व व्यावसायिक संस्था संघटनांच्या त्या कार्यकर्ता, विश्वस्त म्हणून कार्यरत आहेत अभिनव शिक्षण प्रसारक मंडळाच्या त्या कार्यवाह आहेत, सानेगुरुजी राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष आहेत, स्वयंसिद्ध मैत्रीण प्रतिष्ठानच्या अध्यक्षा, स्वावलंबन समाजविकास संस्था आणि सांताक्रूझ स्वावलंबी सहेली संस्थेच्या सल्लागार आम्ही उद्योगिनी, मिती क्रियेशन ब्रांच हेड म्हणून त्या सध्या जबाबदारी सांभाळत आहेत.

मागील २८ वर्षे जेष्ठ, मुलं व महिलांच्या सक्षमीकरणासाठी अत्यंत सातत्याने प्रामाणिकपणे काम करणाऱ्या माधुरी पाटील या देवी महागौरीच्या ज्ञानी, बुद्धीमानी या कौशल्याचे प्रतिनिधित्व करतात.

देवी महागौरी श्लोक :
श्वेते वृषे समरूढा श्वेताम्बराधरा शुचिः।
महागौरी शुभं दद्यान्महादेवप्रमोददा

रोज ९ दिवस आम्ही एक एक देवी आणि तिचे कौशल्य बरोबर नऊ महिलांचा ज्यांच्या तिमिरातून तेजाकडे जाण्याच्या प्रवासामुळे अनेकांना प्रेरणा मिळते आहे, आणि यापुढे देखील मिळत राहील अशा महिला – आधुनिक दुर्गा आपल्यासमोर आणायचा प्रयत्न करणार आहोत.

आपणही जास्तीत जास्त मित्र मैत्रिणींना या पोस्ट ला Tag करून, ही पोस्ट शेअर करून जास्तीत जास्ती समाजापर्यंत ही कल्पना पोहोचवावी ही विनंती.

स्त्रीच्या प्रगतीत सहाय्यक ठरणाऱ्या, खरेतर तिला इतरांपेक्षा वेगळ्या ठरवणाऱ्या मानसिकतेचा, Powerful “Myndful Mantras” चा आपण या नवरात्रीत जागर करू.

या वर्षीच्या इतर नवदुर्गांविषयी माहिती वाचण्यासाठी खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करा –
पहिली माळ – https://bit.ly/MyndfulNavdurga23Day1
दुसरी माळ – https://bit.ly/MyndfulNavdurga2023Day2
तिसरी माळ – https://bit.ly/MyndfulNavdurga23Day3
चौथी माळ – https://bit.ly/MyndfulNavdurga23Day4
पाचवी माळ – https://bit.ly/MyndfulNavdurga2023Day5
सहावी माळ – https://bit.ly/MyndfulNavdurga2023Day6
सातवी माळ – https://bit.ly/MyndfulNavdurga2023Day7

नवशक्तीचा – नवरात्रोत्सवाच्या हार्दीक शुभेच्छा!

श्रेया कुलकर्णी
Founder Myndful Mantras
Clinical Psychologist
REBT Practitioner